देवळा तालुक्यात धक्कादायक घटना – गणेश बागुल यांच्या पपई पिकावर अज्ञात व्यक्तीने फवारले तणनाशक
माळवाडी, ता. देवळा (नाशिक):
देवळा तालुक्यातील माळवाडी गावात एक धक्कादायक घटना घडली असून, येथील शेतकरी गणेश दत्तू बागुल यांच्या ७ महिन्यांच्या पपई पिकावर अज्ञात समाजकंटकाने तणनाशक फवारणी करून मोठे नुकसान केले आहे.
गणेश बागुल यांचे शेत त्यांच्या घराजवळील शिवारात असून, डिसेंबर महिन्यात त्यांनी सुमारे अडीच बिघ्यात पपई लागवड केली होती. परंतु, अलीकडील ५ ते १० दिवसांदरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या शेतात प्रवेश करून तणनाशकाची फवारणी केली. यामुळे संपूर्ण पपई पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
शेतकऱ्याचा पंचनामा व कारवाईची मागणी
या प्रकारामुळे हतबल झालेल्या शेतकरी गणेश बागुल यांनी महसूल विभागाकडे तक्रार दाखल केली असून, शेतात अधिकृत पंचनामा देखील करण्यात आला आहे. त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, या प्रकाराची गंभीर दखल घेऊन तणनाशक फवारणी करणाऱ्या दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी.
त्यांनी असेही सांगितले की, “या प्रकारामुळे केवळ आर्थिक नुकसान झाले नाही तर मानसिक धक्का देखील बसला आहे. अशी घटना पुन्हा कुणाच्या बाबतीत घडू नये म्हणून दोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे.“









