बडगुजरांविरोधात २९ गुन्ह्यांची यादी घेऊन आमदार हिरे मुख्यमंत्रीच्या भेटीला

Published On: June 11, 2025
Follow Us
hiray-meets-cm-against-badgujar-29-cases

शिवसेनेतून हकालपट्टी झालेल्या सुधाकर बडगुजर यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाला आता भाजपमधूनच विरोध होऊ लागला आहे. भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी बडगुजर यांच्या प्रवेशाला विरोध करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांच्या विरोधातील २९ गुन्ह्यांची माहिती दिली.

सुधाकर बडगुजर यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांची नाशिकमध्ये भेट घेतली आणि आपण शिवसेनेत नाराज असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी योग्य वेळी आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले. या भेटीनंतर लगेचच त्यांची शिवसेनेमधून हकालपट्टी झाली आणि ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

दरम्यान, नाशिक दौऱ्यावर आलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी “भाजपचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत” असे सांगून बडगुजर यांच्या प्रवेशाला सकारात्मक संकेत दिले. मात्र, त्यांनी निर्णयाचा अधिकार मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे असल्याचे सांगून जबाबदारी त्यांच्यावर सोपवली.

विधानसभा निवडणुकीत सुधाकर बडगुजर यांनी शिवसेनेकडून सीमा हिरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. दोन वेळा त्यांनी आमदार हिरे यांच्याविरुद्ध निवडणुकीत भाग घेतला. त्यामुळे आमदार हिरे यांचे मत आहे की, पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला अडचणीत आणणाऱ्याला पक्षात प्रवेश देणे योग्य ठरणार नाही. तसेच बडगुजर यांच्यावर गंभीर गुन्हे असल्यामुळे ते स्वतःचा बचाव करण्यासाठी भाजपमध्ये येण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

या पार्श्वभूमीवर आमदार हिरे यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बडगुजर यांच्या विरोधातील गुन्ह्यांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात बडगुजर यांच्यावर दाखल असलेल्या २९ गुन्ह्यांची यादी सादर केली. बडगुजर यांना पक्षात घेतल्यास त्याचा भाजपला काय तोटा होईल, हेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

या भेटीवेळी आमदार हिरे यांच्यासोबत माजी नगरसेवक अ‍ॅड. श्याम बडोदे, माधुरी बोलकर, भगवान दोंदे, सतीश सोनवणे, कावेरी घुगे, प्रतिभा पवार, भाग्यश्री ढोमसे, छाया देवांग, अलका अहिरे, पुष्पा आव्हाड, राकेश दोंदे, मुकेश शहाणे, दिपाली कुलकर्णी, सुप्रिया खोडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Discover Nashik

डिस्कव्हर नाशिक येथे आपणास नाशिकच्या समृद्ध संस्कृती, ऐतिहासिक वारसा, निसर्गरम्य स्थळे, धार्मिक ठिकाणे, खाद्यसंस्कृती आणि स्थानिक घडामोडींची सखोल माहिती मिळेल. आम्ही नाशिकमधील पर्यटन, व्यवसाय, शिक्षण, कला आणि मनोरंजनाशी संबंधित सर्व उपयुक्त माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देतो.

Follow on Instagram

Follow Now

Follow on Threads

Follow Now

Follow on Facebook

Follow Now