नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील मोरेनगर येथील प्रगतशील शेतकरी श्री. मधुकर दादाजी मोरे यांनी तब्बल 3 हजार क्विंटल रेसिड्यू फ्री कांद्याचे उत्पादन घेऊन एक नवा आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे, त्यांचा कांदा युरोपियन स्टँडर्डनुसार गुणवत्तेत उत्तीर्ण ठरल्याने आता तो युरोपियन देशांमध्ये निर्यात केला जाणार आहे.
सध्या बहुतांश कांदा उत्पादक शेतकरी बाजारात मिळणाऱ्या कमी दरामुळे आणि पावसामुळे होणाऱ्या नुकसानीमुळे अडचणीत आहेत. मात्र, मधुकर दादाजी मोरे यांनी सेंद्रिय पद्धतीने केलेल्या मेहनतीमुळे हे संकट पार करत उत्तम गुणवत्ता आणि भरघोस उत्पादन मिळवले आहे.
➤ ३० एकरवर सेंद्रिय कांद्याची शेती
श्री. मधुकर मोरे हे दोन वर्षांपासून पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने कांद्याचे उत्पादन घेत आहेत. यंदाच्या रब्बी हंगामात त्यांनी ३० एकरवर लागवड केली होती. लागवडीपासून काढणीपर्यंत त्यांनी शेणखत, निंबोळी अर्क, मळी आणि जैविक फवारणी यांचा वापर केला. वातावरणातील बदल लक्षात घेऊन त्यांनी नैसर्गिक कीटकनाशक आणि बुरशीनाशक वापरले.
त्यांच्या शेतात प्रति एकर सरासरी १२० ते १३० क्विंटल कांद्याचे उत्पादन झाले. मधल्या काळात आलेल्या अवकाळी पावसामुळे पाच एकर शेताचे नुकसान झाले, तरी उर्वरित क्षेत्रातून त्यांनी जवळपास ३ हजार क्विंटल कांदा पिकवला.
➤ गुणवत्तेचा उच्च दर्जा – युरोपियन BLQ टेस्ट पास
श्री. मधुकर मोरे यांनी यंदा पूर्णपणे सेंद्रिय शेती केली आणि त्या पद्धतीने पिकवलेल्या कांद्याची चव आणि दर्जा अत्यंत उत्कृष्ट ठरला. त्यांच्या कांद्याची BLQ (Below Limit of Quantification) टेस्ट मे महिन्यात करण्यात आली. ही चाचणी युरोपियन स्टँडर्डनुसार यशस्वी झाली आणि त्यांना अधिकृत लॅब रिपोर्टही मिळाला आहे. यामुळे त्यांच्या कांद्याची आता युरोपमध्ये निर्यात होणार आहे.

➤ रासायनिक खतांवरील अवलंबन टाळण्याचा आदर्श
श्री. मधुकर मोरे म्हणतात, “पूर्वी रासायनिक खतांचा वापर केला होता, पण गुणवत्तेचा दर्जा तितका चांगला नव्हता. यंदा पूर्ण सेंद्रिय शेती केली आणि उत्पादनही वाढलं, गुणवत्ता देखील उत्तम मिळाली.” त्यांनी दोन महिन्यांपूर्वी कांदा चाळीत साठवला असून अजूनही तो खराब झालेला नाही, आणि चाळीने कुठेही नुकसानही केलेले नाही.
➤ मार्गदर्शन व मदतीचा हात
या यशस्वी प्रकल्पामध्ये त्यांना बायोमीचे संचालक डॉ. प्रफुल्ल गाडगे, भारत सर, बायोमी टीम अहिल्यानगर आणि वाय. जी. मोरे टीम सटाणा यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले.
-मधुकर मोरे, कांदा उत्पादक शेतकरी, मोरेनगर सटाणा – नाशिक









