नाशिकरोड स्टेशनवर रेल्वेत चढताना तोल जाऊन पडल्याने व्यापाऱ्याचा मृत्यू

Published On: June 11, 2025
Follow Us

हरिद्वार यात्रेसाठी निघालेल्या उल्हासनगर, कल्याण येथील व्यापाऱ्याचा नाशिकरोड रेल्वे स्थानकावर गाडीत चढताना तोल जाऊन पडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची नोंद लोहमार्ग पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

कल्याण, उल्हासनगर-4 येथील 55 वर्षीय व्यापारी हरेश खेमचंद उदासी हे आपल्या पत्नी मेनका (49), मुलगा हीरेन (21) आणि इतर 18 नातेवाईकांसह हरिद्वार एक्स्प्रेसने यात्रेसाठी निघाले होते. सकाळी 8 वाजता कल्याणहून त्यांनी प्रवास सुरू केला.

सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हरिद्वार एक्स्प्रेस नाशिकरोड स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्र. 2 वर थांबली. हरेश उदासी हे पाण्याची बाटली आणण्यासाठी खाली उतरले. दरम्यान गाडी सुरू झाल्याने ते धावत जाऊन पुन्हा चढण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा तोल गेला आणि ते प्लॅटफॉर्म व पटरीच्या दरम्यान पडले.

पडताना त्यांना डोक्याला, हाताला आणि छातीला गंभीर दुखापत झाली. आजूबाजूच्या प्रवाशांनी आरडाओरड केल्याने काही अंतरावर गाडी थांबवण्यात आली. त्यानंतर त्यांना प्लॅटफॉर्मवर आणून तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

याच दिवशी सकाळी मुंब्राजवळ पुष्पक एक्सप्रेस व लोकलमध्ये पडून सहा प्रवाशांचा मृत्यू झाला होता. काही तासांतच नाशिकरोड स्थानकावर घडलेली ही दुसरी मोठी दुर्घटना ठरली.

रेल्वे प्रशासन वेळोवेळी प्रवाशांना चालती गाडी पकडणे धोकादायक असल्याचा इशारा देत असते. यासाठी स्टेशनवर सूचना फलकही लावण्यात आले आहेत. तरीही अनेक प्रवासी निष्काळजीपणा करत आपला जीव धोक्यात घालतात. प्रवासादरम्यान नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सचिन बनकर यांनी सांगितले.

Discover Nashik

डिस्कव्हर नाशिक येथे आपणास नाशिकच्या समृद्ध संस्कृती, ऐतिहासिक वारसा, निसर्गरम्य स्थळे, धार्मिक ठिकाणे, खाद्यसंस्कृती आणि स्थानिक घडामोडींची सखोल माहिती मिळेल. आम्ही नाशिकमधील पर्यटन, व्यवसाय, शिक्षण, कला आणि मनोरंजनाशी संबंधित सर्व उपयुक्त माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देतो.

Follow on Instagram

Follow Now

Follow on Threads

Follow Now

Follow on Facebook

Follow Now